धाराशिव : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज 13 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय,धाराशिव येथे उत्साहात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आरोग्य विभाग आणि शालेय विभागाच्या वतीने करण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा उद्देश विशद करण्यात आला.मुला-मुलींमध्ये जंतांमुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास प्रतिबंध करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगितले.जंतामुळे रक्तक्षय,भूक मंदावने आशक्तपणा व चिडचिड, पोटदुखी,मळमळ,जुलाब,वजन घटने पोटावर सूज येणे यासारखी गुंतागुंत होऊ शकते.जंतामुळे मुले नेहमी आजारी पडतात.अशी माहिती प्रास्ताविकातून जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी दिली.

वर्षातून फेब्रुवारी व ऑगस्ट अशा दोन वेळात राज्यात जंतनाशक मोहिम राबविली जाते.जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील ३ लाख १३ हजार ८१४ आणि १ लाख १३ हजार १६१, अशा १ ते१९ वर्षे वयोगटातील एकुण ४ लाख २६ हजार ५७५ मुला-मुलींना आज जंत नाशक गोळीची मात्रा दिली जाणार आहे.या वेळी १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमुलींना अल्बेन्डॅझॉलची गोळी खाऊ घातली. १३ फेब्रुवारी या दिवशी मुले-मुली शाळेत अनुपस्थित असतील किंवा आजारी असतील अशा लाभार्थींना जंतनाशक गोळीची मात्रा २० फेब्रुवारी मॉपअॅप दिन रोजी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी मार्गदर्शनातून सांगितले.

अल्बेन्डॅझॉलची गोळी ही मुला – मुलींसाठी सुरक्षित आहे.ही गोळी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका /आशा व शाळांमध्ये शिक्षक /आरोग्य सेवक/सेविकांनी खावू घालायची असून,पालकांसोबत अथवा मुला-मुलींसोबत घरी देण्यात येणार नाही.असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी पुढे बोलताना जंताचा प्रादुर्भाव कसा होतो,जंतामुळे शारीरिक व मानसिक दुष्परीणाम शरीरावर कसे होतात. जंतनाशक गोळी खाल्ल्याने बालक क्रियाशील बनते व त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.शारीरिक व बौध्दीक वाढ सुधारते याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री.घोष यांनी केले.

       जंत कमी करण्याकरीता अधिकचे उपाय म्हणजे नखे स्वच्छ ठेवावी व वेळेवर कापावीत,पायात नेहमी बुट किंवा चप्पलचा वापर करावा, अनवाणी पायांनी चालू नये, उघड्यावर शौच्चास बसू नये,नेहमी शौचालयाचा वापर करावा.आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत,(विशेषतः जेवणा आधी आणि शौचाहुन आल्यानंतर) तसेच जंताचे प्रकार सांगितले आणि विद्यार्थ्यांनी स्वतः जंताची गोळी घ्यावी व वैयक्तीक स्वच्छता ठेऊन इतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत व आरोग्याचे महत्त्व पटवून सांगावे व आरोग्यदूत म्हणुन कार्य करावे. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी आवाहन केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी,राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख,सचिव धनंजय पाटील, मुख्याध्यापक पी.एन.पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.लोखंडे, सांख्यिकी पर्यवेक्षक एस.एस.पवार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड,जिल्हास्तरीय पर्यवेक्षक राजेश सुपेकर,तालुकास्तरीय पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यीका धनके, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व औषध निर्माण अधिकरी आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक होळे यांनी केले.आभार जिल्हा आर.के. एस.समन्वयक किशोर गवळी यांनी केले.

****

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *